अवेळी पाऊस बरसल्याने भात शेतीचे नुकसान
ऐन दिवाळीत शेतकरी संकटात ;
प्रतिनिधी-कल्पेश पवार ;-
आज बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण होते, दुपारी अचानक उष्मा वाढला आणि ०४ वाजता अवेळी पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले, पावसाने शेतकरी वर्गाची धावपळ उडाली असून शेतीच्या कापणी, झोडणी,मळणीच्या कामांवर त्याचे परिणाम झाले आहेत.यंदा गेल्या कित्येक वर्षाच्या मानाने शेतीलायक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग पुरता समाधानी दिसत आहे.सर्वत्र पीक ही चांगले आलेलं, शेतामध्ये कापणी, झोडणी, मळणीच्या कामांमध्ये शेतकरी गुंतलेला आहे तर वरकस भागात काही ठिकाणी अद्याप कापनीही झालेली नाही, अशा परिस्थितीत अवेळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची दाणादाण उडाली, सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पाऊस बरसेल असे चित्र निर्माण झाले होते, अखेर तो बरसलाच,पावसाळी भातशेतीचा विचार करता दरवर्षी पावसाने तयार भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचा आजपर्यन्तचा इतिहास आहे.
ऐन भाताची कापणी झोडणीच्या काळात पाऊस पडला तर भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व आर्थिक बजेट तर ढासळतेच याचबरोबर वर्षाची साठवण, बी-बियाणे व गुरांच्या चा-याचाही प्रश्न भेडसावतो. याशिवाय एकदा की भात भिजले की ते कवडीमोल भावाने विकावे लागते. त्यामुळे पावसाने अवेळी हजेरी लावून धोका दिल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. हंगामात सुरु असतानाच अवेळी आलेल्या पावसाने तयार भातशेती, नाचणी व वरीची शेती आदींना फटका बसला आहे. पिके हातात यायच्या सुमारास पडलेल्या परतीचा वादळी पाऊसाने शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.