सकल मराठा समाजाची तत्परता, शालेय दाखले, जाती नोंदीबाबत चर्चा, तहसीलदारांना निवेदन

सकल मराठा समाजाची तत्परता, शालेय दाखले, जाती नोंदीबाबत चर्चा, तहसीलदारांना निवेदन

प्रलंबित शालेय दाखले तातडीने देण्याचे आश्वासन

रोहा /कोलाड (प्रतिनिधी) सरकारी दप्तरात नोंदी तपासून समाज बांधवांना तातडीने दाखले देणे, आजगायत कुणबी मराठा किती नोंद सापडल्या किती दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रक्रियेत अडथळे काय ? याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेतली. मुख्यतः तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या दाखल्यांना विलंब होत आहे. दाखल्यांसाठी विद्यार्थी त्यांचे पालक दररोज पायपीट करत आहेत. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दाखले वेळेत मिळत नाहीत अशा प्रचंड तक्रारी समोर आल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी नेमकी अडवणूक कुठे होते ? याही महत्त्वाच्या विषयावर तहसीलदार देशमुख यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती तहसीलदार किशोर देशमुख यांनी शालेय विविध दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत जलद सुरू आहे. उर्वरीत प्रलंबित दाखले तात्काळ दिले जातील असे ठोस आश्वासन तहसीलदार किशोर देशमुख यांनी समाज शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सर्वकश शालेय दाखल्यांसाठी सकल मराठा समाजाने तत्परता दाखविली, प्रलंबित दाखले विषय निवेदनातून समोर आणल्याने शेकडो विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले तर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचीही भेट घेऊन समाज बांधवांच्या दाखल्यांवरील नोंदी त्यावर उपाययोजना, शालेय विद्यार्थ्यांचे दाखले मुख्यतः डोंगरी दाखल्यांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा केली. डोंगरी दाखल्यांबाबत अधिक जनजागृती व्हायला हवी अशी अपेक्षा प्रांताधिकारी खुटवड यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राज्यात मराठा समाजाचा आरक्षण मुद्दा कायम गाजत आहे. सातत्यपूर्ण आंदोलनातून कुणबी मराठा दाखला प्रक्रियेला सकारात्मक यश आले. तरीही कोकण मुख्यतः रायगड जिल्ह्याची दाखल्यांबाबत भौगोलिक स्थिती वेगळी आहे. याच मुद्द्यावर समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी सहकाऱ्यांसमवेत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्या भेटीत कोकणातील कुळ, दाखल्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. जरांगे पाटील यांनी हा मुद्दा लगेचच ना. शंभूराजे देसाई यांच्या कानावर घातला व वरील मुद्दे अधिक समजून घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पाटील यांनी मराठा प्रतिनिधींना दिले. या दौऱ्यात शिष्टमंडळाने आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा गावांना भेट देऊन थोर समाजसेवकांची भेट घेतली. याच धर्तीवर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रोहा प्रांताधिकारी, तहसीलदार यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष अप्पा देशमुख, उपाध्यक्ष नितीन परब, संदीप सावंत, निलेश शिर्के, राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख, राजेश काफरे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी शैक्षणीक प्रवेश घेण्यासाठी दाखल्यांची लगबग सुरू आहे. मात्र सेतू व काही अधिकाऱ्यांकडून दाखल्यांचा तातडीने निपटारा होत नाही. दाखल्यांना विलंब होत आहे. दाखल्यांना उशीर झाल्यास प्रवेश मिळणार नाही हीच धास्ती विद्यार्थी व पालकांना आहे. दाखल्यांसाठी दररोज हेलपाटा मारावा लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागते. हा गंभीर प्रकार तहसीलदार किशोर देशमुख यांच्या निदर्शनास आणले, त्यावर दाखल्यांच्या कामांना प्राधान्यक्रम दिला आहे‌. तरीही दाखल्यांना उशिर झाला असेल तर माहिती द्या, दाखले तात्काळ दिले जातील असे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले. चर्चेतून विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल हे स्पष्ट झाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. कुणबी मराठा सरकारी दप्तरातील नोंदी, दाखल्यांचे वाटप, त्यातील त्रुटी यावरही चर्चा करण्यात आली. तर दाखल्यांतील नोंदी व दाखले वाटप प्रकरणावर यापुढेही सातत्याने काम करू, समाज बांधवांना न्याय देऊ अशी प्रतिक्रिया अप्पा देशमुख यांनी दिली. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत मराठा समाज शिष्टमंडळाने तत्परता दाखवल्याने सर्व समाजातून धन्यवाद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *