एम. डी. एन फ्युचर स्कूल विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्ताने कोलाड येथे काढली शोभा यात्रा
कोलाड-कल्पेश पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, एमडीएन स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून व विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून उत्साहात साजरी केली.
शिवजयंती निमित्त आंबेवाडी प्राथमिक उपचार केंद्र ते मराठा पॅलेस यादरम्यान शोभायात्रा काढून व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.सकाळी नऊ वाजता शोभायात्रा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यानी विविध घोषणांनी शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविले. आंबेवाडी नाका येथे भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.सर्वात प्रथम इयत्ता सहावीचा विद्यार्थी पार्थ शिंदे हा शिवगर्जना देण्यासाठी आला व आपल्या बुलंदी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
शिवनेरी किल्ल्यावर ज्या पद्धतीने बाल शिवबाला पाळण्यात घातले गेले असेल, अगदी तसाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सुंदर पाळणा चिमुकल्या विद्यार्थिनीनी नाटिकेतुन सादर केला व उपस्थितांची मने जिंकली.
प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची झालेली भेट हा रोमहर्षक प्रसंग इयत्ता सातवी चा विद्यार्थी श्रीश केळुसकर व त्याचे सवंगडी यांनी बुलंद आवाजात पोवाड्याच्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर केला. तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर सुद्धा रोमांच उठले असतील असा आवाज गगनभेदी होता.
महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील मावळ्यांना, लेकिबाळींना स्वसंरक्षणासाठी लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जात असे. त्यात तरबेज होऊन प्रसंगी शत्रूंशी ही दोन हात करण्यात मागे-पुढे पाहत नसत ,याचेच प्रात्यक्षिक इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी ,दांड पट्टा व तलवारबाजी यांच्या अतिशय शिस्तबद्ध, रोमहर्षक पद्धतीने सादर करून प्रेक्षकांसमोर हुबेहूब नाट्यमय रीतीने शिवकाल उभा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लाठीकाठी चे प्रशिक्षण देण्याकरता जीडीटी फ्युचर स्कूल चणेरा चे प्रशिक्षक श्री सनी घाग व त्यांचे विद्यार्थी सुजल जगडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
यासाठी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री देवेंद्र चांदगावकर, मुख्याध्यापिका श्रीमती योगिनी देशमुख व शिक्षक वर्ग मार्गदर्शन करीत होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप तटकरे साहेब, सचिव श्री प्रकाश सरकले , रजिस्ट्रॉर श्री अजित तेलंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात कोलाड पोलीस यांचा महत्त्वाचे सहकार्य लाभला.