मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला.
रोह्यात मंगळवार पासून साखळी उपोषण!
प्रतिनिधी-कल्पेश पवार :-
बहुचर्चीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी, जि. जालना येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रोहा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार दि ३१ ऑक्टो. पासून साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली असून, संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन उभे राहू लागले आहे. रायगड जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये तसे फ्लेक्स झळकू लागले आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी रोहा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात बैठक आयोजित केली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रोहा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नगरपालिका चौकात मंगळवार दि ३१ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे. बैठकीला तालुक्यातील मराठा समाजातील असंख्य तरुण उत्स्फूर्तपणे एकत्र जमले होते. या वेळी प्रत्येकाने आपली मते मांडली. केंद्राला यात ओढू नका सांगून मराठा आरक्षणावर मोदी सरकारने हात झटकले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मराठा समाजा बाबत काय विचारधारा आहे हे ही स्पष्ट होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस साखळी उपोषण रोहा नगर पालिका चौकात ३१ ऑक्टोबर सकाळपासून सुरू करणार असून संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरविण्यात येईल असे तालुका अध्यक्ष अप्पा देशमुख यांनी सांगितले.बैठकीला ज्येष्ठ नेते व्ही टी देशमुख, साळुंखे सर, संदीप सावंत, रत्नप्रभा काफरे, महेश सरदार, सुर्यकांत मोरे, मयूर पायगुडे, प्राजक्ता चव्हाण व शेकडो मराठा समाजबांधव उपस्थित होते.
*****? *********