कालव्याच्या पाण्यासाठी ‘बळीराजा’ आक्रमक,१६ऑक्टोबर जागतिक अन्न दिनी पाणी जागर आंदोलन

कालव्याच्या पाण्यासाठी ‘बळीराजा’ आक्रमक, १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिनी पाणी जागर आंदोलन
पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करणार, ग्रामस्थांचा इशारा, प्रशासन सतर्क
प्रतिनिधी (कल्पेश पवार) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार ? याचे स्पष्ट संकेत बळीराजा फाउंडेशनने मंगळवारी सायंकाळी दिले. कालव्याला आठदहा वर्षे पाणी नाही. त्यामुळे सबंध परिसरात उन्हाळी अखेर भीषण पाणीबाणी निर्माण होते. परिसरात पाणी नसल्याने पाण्याचा स्त्रोत पूर्णतः निकामी होतो. झाडांनी माना टाकल्या, उन्हाळी भातशेती इतिहास जमा झाली. त्यामुळे कालव्याला पाणी पूर्णवत करावे, या मागणीसाठी विभागातील ग्रामस्थ शेतकरी १०१७पासून आग्रही आहेत. अखेर पाण्यासाठी ग्रामस्थांनी १ मे महाराष्ट्र दिनी सुरू केलेले आमरण उपोषण कालव्याला पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले होते, मात्र कालव्याची दुरुस्ती कामे पूर्णत्वास गेली नाही. कालव्याला पाणी देण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरले.आता मागील सर्व घडामोडी विचारात घेता बळीराजा फाऊंडेशन अधिक सतर्क झाली. यावेळी आम्हाला डिसेंबर हंगामात कालव्याला पाणी मिळायलाच हवे, असा आक्रमक पवित्र घेत १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिनी पाणी जागर अभियान आंदोलन करण्याचा ईशारा बळीराजा फाउंडेशनने दिला. महत्त्वाच्या कालव्याच्या पाणी प्रश्नाकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन असल्याचे बळीराजा फाउंडेशनने स्पष्ट केले. तसे निवेदन बळीराजा फाउंडेशनच्या ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील प्रशासनाला दिले. त्यामुळे कालव्याचा पाणी प्रश्न चांगलेच पेटणार ? हे समोर आले आहे. दरम्यान, पाटबंधारे प्रशासनाने ग्रामस्थांची वारंवार फसवणूक केली. २०२३च्या सिंचन हंगामात कालव्याला पाणी सोडण्याची स्पष्टता दिसून न आल्यास संबंधीत प्रशासनाविरोधात आमरण उपोषण, प्रसंगी आत्मदहनसारखे प्रखर आंदोलन उभे करू, असा  गंभीर गर्भित ईशारा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी निवेदनातून दिल्याने नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोलाड पाटबंधारे प्रशासनाने कालवा दुरुस्तीच्या नावाखाली कालव्याचे पाणी बंद केले. कालव्याची दुरुस्ती होऊन सुरळीत पाणी चालू राहील, याच अपेक्षेने ग्रामस्थांनी संमती दिली. मात्र कालव्याची नीटनेटकी दुरुस्ती झाली नाही. एवढेच काय ? कालव्याच्या काँक्रिटीकरण, नको तिथे मोऱ्या कामाच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार झाला. ठेकेदार, काही अधिकारी, काही नेतेगण मालामाल झाले हे अधोरेखीत झाले आहे. कालव्याला आठदहा वर्ष पाणी सोडलेच नाही. अखेर २०१७पासून ग्रामस्थांनी कालव्याच्या पाण्यासाठी आग्रही मागणी सुरू केली. सह्यांची मोहीम उघडली. निवेदने दिली. त्या सर्व प्रयत्नांना आजवर अपेक्षित यश आले नाही. कालव्याची दुरुस्ती झाली नाही. त्यानंतर अखेर ऑक्टोबर २०२२ला विभागीय ग्रामस्थांनी एकत्र येत समन्वय समितीने प्रशासनाला धारेवर धरले.आंदोलन केले.१ मे महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांनी पाण्यासाठी आमरण उपोषणाला प्रारंभ केले. त्याचा धसका घेत पाटबंधारे प्रशासन भानावर आले.कालव्याचा पाणी प्रश्न, आंदोलनाचे पडसाद विधिमंडळात उमटले पाटबंधारे प्रशासनाने उपोषणकर्ते ग्रामस्थांना कालव्याची दुरुस्ती कामे उरकून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. तूर्तास उपोषण स्थगित केले‌. मात्र २०२३ सिंचन हंगामात कालव्याला पाणी आलेच नाही. दुरुस्ती कामे रखडली. ग्रामस्थांची फसवणूक झाली. याच अनुभवातून आता ग्रामस्थ प्रचंड आक्रमक होत प्रारंभी पाणी जागर आंदोलनाचे निवेदन तहसीलदार किशोर देशमुख यांना मंगळवारी दिले.यावेळी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे,संस्थापक राजेंद्र जाधव, तुकाराम भगत,अ‍ॅड दीपक भगत, पत्रकार शशिकांत मोरे, रुपेश साळवी, समिधा अष्टीवकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा, राज्यातील बहुचर्चित आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला २०२३ सिंचन हंगामात पाणी सोडण्याचे दिलेले आश्वासन पाटबंधारे प्रशासनाने पाळले नाही. ग्रामस्थांची पुन्हा दिशाभूल झाली. अखेर विभागीय ग्रामस्थांनी मंगळवारी बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून तहसील प्रशासनाला पुढील सर्व आंदोलनाबाबत निवेदन दिले. पाण्यासाठी एल्गार सुरू केल्याचे स्पष्ट संकेत दिले. कालव्याची सर्व दुरुस्ती कामे आधीच पूर्ण करावीत. महत्त्वाच्या कालव्याच्या पाणी प्रश्नाकडे तहसील, पूर्णतःपाटबंधारे प्रशासन,लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी पाणी जागर अभियान केले जाणार आहे. त्यातून कालव्याला पाणी सोडण्याची स्पष्टता न दिल्यास पाटबंधारे प्रशासनाविरोधात आमरण उपोषण, प्रसंगी आत्मदहनसारखे प्रखर आंदोलन उभारले  जाईल याची सर्वच प्रशासनाने दखल घ्यावी. पुढील सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार असेल अशी आक्रमक प्रतिक्रिया बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने तातडीने पाटबंधारे प्रशासन सतर्क झाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी रायगड पाटबंधारेचे मुख्य कार्य अभियंता मिलिंद पवार, अभियंता एस एस महामुनी यांनी आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याच्या कामांचा आढावा घेतला, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मात्र कालव्याची दुरुस्ती, त्यानंतर पाणी सोडण्याबाबत हयगय झाल्यास विभागीय ग्रामस्थ काय पवित्रा घेतात ? याकडे रोह्यासह सबंध जिल्हा, राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *