रस्त्याच्या समस्येसाठी रायगड प्रेस क्लब उतरली रस्त्यावर..

ही आहे चीड… हा आहे संताप…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेत्यांच्या नावाने शिमगा!
रस्त्याच्या समस्येसाठी रायगड प्रेस क्लब उतरली रस्त्यावर..
लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंधच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत – एस एम देशमुख
आता रायगड प्रेस क्लबचे आंदोलन प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या दारात होणार !
वाकन – रोहा – रायगड प्रेस क्लबच्या वतीने नागोठणा ग्रामिण पत्रकार संघाच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्याची वडखळ ते इंदापूर पर्यत झालेल्या दुरावस्थेच्या विरोधात आज वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलनाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शन एस एम देशमुखांनी या महामार्गाच्या कामात सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींचे असलेले आर्थिक हितसंबंध हेच महामार्गाच्या विलंबास व दुरावस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप करीत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पुर्ण न झाल्यास १५ सप्टेंबर रोजी रायगड मधील सर्व लोकप्रतिनिधींच्या दारा समोर पत्रकारांचे बोंबाबोंब आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.
रायगड प्रेस क्लबच्या या बोंबाबोंब आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सचिव अनिल मोरे, खजिनदार दर्वेश पालकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगड जिल्हा निमंत्रक विजय मोकल, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागिय सचिव अनिल भोळे,नागोठणे ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष महेश पवार आदी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातील वाकण फाटा येथे मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर यांनी महामार्गाच्या कामात लोकप्रतिनिधींना मटेरिअल सप्लाय ची कामे हवी असल्यानेच कासू ते इंदापूर रस्ता रखडला आहे, ज्यांच्यामुळे हे काम रखडले आहे तेच लोकप्रतिनिधी विधीमंडळात आवाज उठवत आहेत ही शरमेची बाब आहे. महामार्गाच्या सर्व कामात यांना वाटेकरी व्हायचे असते सत्ताधार्‍यांनाही या कामात खरी अडचण कुणामुळे होते हे माहित आहे मात्र सर्वाचे हितसंबंध गुंतले असल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असून ग्रिनीज बुकात या मार्गाची नोंद करायला हवे असे सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी गेली १५ वर्षे पत्रकार या महामार्गासाठी आंदोलने करीत आहेत. अन्य ठिकाणचे महामार्ग मागून सुरु होऊन पूर्ण झाले मात्र कोकणात जाणारा हा महामार्ग अजुनही रखडला आहे हे कोकणातील लोक प्रतिनिधींचे अपयश आहे असे सांगितले.
यावेळी रायगड प्रेस क्लब च्या पदाधिकारी, आंदोलनात सहभागी झालेल्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा आपल्या मनोगतातून निषेध नोंदवला. यावेळी नागोठणे येथील भजनी मंडळाने मुंबई गोवा महामार्गावर रचलेल्या गाण्यांच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवला.
यानंतर निडी नागोठणे येथील महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खडुयांच्या ठिकाणी जाऊन सर्व लोकप्रतिनिधीच्या नावाने बोंबाबोंब करीत निषेध व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी चिखलयुक्त खडुयात उतरुन नोंदवला निषेध !
निडी येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्याचे ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन सुरु असताना रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी या चिखलयुक्त खडुयात बसून आपला राग व्यक्त केला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनात रोह्याचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांनीही सहभाग घेत या खडुयांमध्ये झाडांची रोपे लावून त्यांना खासदार आमदारांची नावे दिली. या रस्त्याप्रति असलेल्या निष्क्रियतेसाठी कोकणातील लोकप्रतिनिधीना १० हजार एस एम एस पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *