रोहयात 6 हजारांची लाच घेताना सहा. फौजदारास रंगेहात पकडले ; लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई
रोहा – प्रतिनिधी :- रोहा पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार गोविंद रघुनाथ मदगे यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
लाचलुचपत विभाग रायगचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील कांतीलाल तुकाराम वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रवीणा कांतीलाल वाघमारे यांच्याविरुद्ध दि. 04 मार्च रोजी विवाद व झटापट केले बाबतची तक्रार रोहा पोलिसांत दिली होती. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. हे प्रकरण कौटुंबिक व अदखलपात्र स्वरूपाचे असून देखील तक्रारदार यांची आई प्रवीणा वाघमारे हिला अटक करावी लागेल असे तक्रारदार यांना बोलावून घाबरवले गेले, व सदर तक्रारीत मदत करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी सहा. फौजदार गोविंद मदगे यांनी केली, तडजोडीअंती रु. 6 हजार लाच देण्याचे ठरले. रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ लाचलुचपत विभागाच्या शशिकांत पाडावे, स.फौ. विनोद जाधव, स. फौ. शरद नाईक, पो.ह. महेश पाटील, पो.ह. कौस्तुभ मगर यांच्या पथकाने सापळा रचून गोविंद मदगे यांना ही लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. पुढील कारवाई रोहा पोलीस ठाणे येथे करण्यात येत असल्याची माहिती पाडावे यांनी दिली.