उद्या १४ रोजी कुणबी समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार
हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार
कोलाड-खांब,दि.१३(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
जातीच्या दाखला मिळण्याकामी असणा-या जाचक अटी रद्द करून समाजाचा जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी उद्या दि.१४ रोजी कुणबी समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार असून आपल्या मागणीचे निवेदन देऊन शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेणार आहेत.
जातीच्या दाखल्याअभावी समाजाचे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या होणारे नुकसान टाळण्यासाठी व पुढील पिढीला शिक्षण घेताना आरक्षणाच्या बाबतीत दाखल्याचा अडसर ठरत असल्याने जातीचा दाखला मिळण्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करून दाखला मिळावा ही उद्याच्या मोर्च्याची मुख्य मागणी असून उद्या १४ रोजी शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी संपुर्ण रोहा तालुक्यातील समाजबांधव एकवटला असून समाजातील खेड्यापाड्यात व अति दुर्गम भागात राहणारे समस्त कुणबी समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या महिना भरापासून समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी व तमाम समाजबांधवांनी मोर्चाची संपुर्ण तयारी केली असून सदरचा मोर्चा न भूतो न भविष्यती होण्यासाठी समाजातील सर्वच समाजबांधव, भगिनी व युवा वर्ग स्वतःहून सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य करताना दिसत आहेत.तर जास्तीत जास्त समाजबांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी गावागावात गाव बैठकांचे सत्र आयोजित करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याने गावागावात संपन्न झालेल्या गाव बैठकांना प्रत्येक गावागावांतील समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याने व उद्याच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीने समाजाच्या इतिहासात एक वेगळी नोंद ठरणार आहे.तर जातीच्या दाखल्याअभावी समाजाचे होणारे शैक्षणिक बाबतीत व अन्य बाबतीत होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाचे लक्ष केंद्रित करून १९६७ ची अट काढून टाकण्यासाठी उद्याचा हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याने सदरचा मोर्चा हा अतिशय शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून काढण्यात येणार असल्याची माहिती शेवटी देण्यात आली आहे.