श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांची राष्ट्रकल्याणार्थ श्री कनकेश्वर मंदिरात रुद्रपाठ सेवा
खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)
प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (दिंडोरी) यांच्या आदेशानुसार बुधवार दि. ७ आॅगस्ट रोजी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुयश कॉलनी वरसे रायगड तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चोंडी अलिबाग येथील ११० सेवेकरी बंधू भगिनींनी अलिबाग तालुक्यातील अतिशय जागृत देवस्थान असलेल्या कनकेश्वर शिवमंदिरात भगवान शंकराची अतिउच्च रुद्रपठणाची सेवा महादेवांचे चरणी रूजू केली.
बुधवारी ता.७ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून राष्ट्रहितासाठी करण्यात आलेल्या या सेवेत सर्वप्रथम देशावरील परराष्ट्र आक्रमणाचा धोका टळावा तसेच अतिवृष्टीचा धोका टळून योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी कनकेश्वर महाराजांचे चरणी विधीपुर्वक संकल्प करण्यात आला.तद्नंतर शिवपिंडीवर जलाभिषेक, गणपती अथर्वशीर्ष, श्री रामरक्षा, रूद्र पठण,१०८ शिवनामावलीसह शिवपिंडीवर बिल्वपत्र अर्पण, पर्जन्यसुक्त इ. सेवा रुजू करण्यात आली. यावेळेस उपस्थित भाविकांना दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा मार्गाची माहितीही देण्यात आली.
अध्यात्मिक कार्यक्रमांसह समाजहिताच्या दृष्टीने वृक्षारोपण, बालसंस्कार शिबीर, आरोग्यशिबीर, नदीस्वच्छता, दुर्गसंवर्धन इ. कार्यक्रम वारंवार राबविणा-या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.