विद्यार्थ्यांना ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन*
साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा स्तुत्य उपक्रम*
खांब-रोहा,दि.२९(नंदकुमार मरवडे)
विद्यार्थ्यांना ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहयोगाने संपन्न करण्यात आला.
सर्वदूर शिक्षण व रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक विकास या ध्येयातून कार्य करणाऱ्या
साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सदरील ई-एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे तथा मुख्य मार्गदर्शक दिनानाथ जैस्वाल, डॉ.असिफ कासकर, मुख्याध्यापक दिपक जगताप,सहा.शिक्षक नरेंद्र माळी, सामाजिक कार्यकर्ते मारूती तुपकर, महेश तुपकर आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागतपद्याने करण्यात आली.तर उपस्थित
मान्यवरांचे स्वागत करून मुख्य मार्गदर्शक
दिनानाथ जैस्वाल यांनी ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करताना संगणकाची प्रारंभिक माहिती, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तसेच संगणकाचे सुटे भाग,संगणक जोडणी आदींबाबत सविस्तर माहिती देऊन संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन संगणक साक्षर व्हावे.यासाठी सर्वतोपरी आमच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डॉ.असिफ कासकर व मार्गदर्शक दिनानाथ जैस्वाल यांनी अभिवचन दिले.तर श्रमिक विद्यालय चिल्हे येथील तंत्रज्ञान क्षेत्रातील गरज ओळखून लवकरच येथे प्रोजेक्टर देण्याचे आश्वासन डॉ.असिफ कासकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.