
सहस्रपैलू झुंजार कबड्डी खेळाडू व सर्वप्रिय व्यक्तिमत्व विकास थळे यांचे दुःखद निधन
खांब,दि.१२(नंदकुमार मरवडे)
कुर्डुस गावातील सर्व माणसांच्या गळ्यातील ताईत, सर्व आबालवृद्धांचा लाडका , सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारा पुण्यवान व्यक्ती व कबड्डीचा सहस्त्रपैलू झुंजार खेळाडू विकास पांडुरंग थळे यांचे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने कुर्डुस पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
विकास थळे हा यंगस्टार कुर्डुस या प्रसिद्ध कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू होता.अनेक मैदाने त्याने गाजवली .सुमारे चाळीस वर्षे कबड्डीवर अधिराज्य गाजवले.अनेकवेळा त्याने कबड्डी व खोखो मध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक संघातही त्याची निवड झाली होती. तसेच क्रिकेट आणि अथेलेटिक्स मध्येही ते निष्णात होते
सामाजिक कार्यात तर ते नेहमी हिरीरीने पुढे असायचे. प्रत्येकाच्या सुखदुःखात पाठीशी असायचे.त्यांच्या प्रेमळ ,दयाळू आणि मायाळू स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके होते. नातेमंडळी , मित्रमेळा , समाज, परंपरा आणि संस्कृती जपणारे त्यांचे वागणे असायचे. सर्वांसाठी सदैव तत्पर असायचे. सर्व परिसरात त्यांना दादया या प्रेमळ नावाने संबोधले जायचे. त्यांच्या आत्यंतिक आपुलकी आणि प्रचंड माणुसकीच्या स्वभावामुळे ते सर्वांच्या जिव्हाळ्याचे होते.
असा हा गुणवन्त, किर्तीवंत , समाजसेवी,पुण्यश्लोक , सर्वांसाठी धडपड्या माणूस निघून गेल्यामुळे कुर्डुस भागात पोकळी निर्माण झाली आहे.विकास थळे यांचे उत्तरकार्य रविवार दि.२० आॅक्टोबर रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.